* वधु – वर
विशेष मेळावा *
अंध, अपंग, कर्णबधिर, मूकबधिर, व्यंग, पांढरे डाग इत्यादी .
शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या
कात्यायनी वधु – वर केंद्र आणि सौ. स्वाती संभूस यांचे स्वाती वधु – वर
केंद्र तसेच लायन्स क्लब पुणे सुप्रीम यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेने
यावेळेस प्रथमच अंध, अपंग, कर्णबधिर, मूकबधिर, व्यंग, पांढरे डाग असलेल्या
वधु- वरांचा विशेष मेळावा घेतला. यामध्ये लायन्स क्लबच्या लायन सौ. सुनीता
कुलकर्णी यांचाही सहभाग होता.
प्रथमच घेतल्या गेलेल्या या मेळाव्यात लोकांचा प्रतिसादही चांगला होता.
साधारण लोकांचे विवाह सहज जमतात. परंतु व्यंग असणाऱ्यांसाठी खरे प्रयत्न
व्हायला हवेत. यासाठी हा मेळावा घेण्याचे संस्थेने ठरविले. सुरुवातीला
दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेचे कार्यध्यक्ष श्री.
विश्राम कुलकर्णी यांनी हा मेळावा घेण्यामागचे कारण स्पष्ट करत संस्थेच्या
कार्याची माहिती दिली. आजपर्यंत कात्यायनी आणि स्वाती वधु -वर केंद्राने
बरेच मेळावे घेतले. दरवर्षी प्रथम वधु – वरांचा एक मेळावा होतोच. तर
घटस्फोटितांचे एका वर्षात सहा मेळावे होतात. या माध्यमातून बरेच विवाह
ठरतात. हे सर्व कार्य आजपर्यंत कोणत्याही आर्थिक मदतीची विशेष अपेक्षा
ठेवून केले जात नाही. तर संस्थेच्या माध्यमातून सर्वांना चांगल्या प्रकारची
स्थळे मिळून त्यांचे आयुष्य चांगल्या प्रकारे व्यतीत व्हावे ही एकाच
प्रामाणिक इच्छा असते. प्रथमच घेतलेल्या या मेळाव्यात (दिव्यांगांचा,
अपंगांचा, पांढरे डाग, कर्णबधिर, मूकबधिर) महाराष्ट्रातून जालना,
औरंगाबाद, नाशिक, सातारा, वालचंदनगर, कऱ्हाड इत्यादी ठिकाणच्या लोकांनी
सहभाग घेतला. याबद्दल कार्याध्यक्षांनी समाधान व्यक्त केले.
यानंतर लायन्स क्लबच्या लायन सौ. सुनीता कुलकर्णी यांचा सत्कार सौ. स्वाती
संभूस यांनी केला. शाल, श्रीफळ, मोमेंटो असे सत्काराचे स्वरूप होते.
सत्कारानंतर लायन सौ. सुनीता कुलकर्णी यांनी आपले मनोगत मांडले. त्यात
त्यांनी लायन्स क्लबची माहिती देऊन त्यांचे उद्दिष्टही सांगितले. तसेच
लायन्स क्लब तळवडे प्राईडचे अध्यक्ष लायन श्री. सुधीरकुमार अगरवाल यांनी या
मेळाव्यास आवर्जून भेट देऊन संस्था व लायन्स क्लब पुणे सुप्रीम करीत
असलेल्या या उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून श्री. रमेश सदाशिव आडकर (भोर) यांचा सत्कार
करण्यात आला. शाल, श्रीफळ, मोमेंटो असे त्याचे स्वरूप होते. श्री. रमेश
आडकर यांनी २००६ साली गुढी पाडव्यास ‘संकल्प वधु – वर’ संस्था या नावाने
वधु – वर मंडळाचे काम सुरु केले. ब्राह्मण समाजातील विधवा,
विदुर,घटस्फोटित, विनापत्य, सापत्य, अपंग, व्यंग, पांढरे डाग (कोड), अशा
स्थळांसाठी विशेष सहकार्य असून ४० हुन अधिक वधु -वरांचे विवाह त्यांनी
जमविले आहेत.
मेळाव्यात सौ. स्वाती संभूस यांनी ‘स्वाती वधु -वर’ केंद्राच्या
माध्यमातून आलेले अनुभव सांगितले. त्यांनी माणसं कशी चांगली हे बघावं.
त्यांची मिळकत न बघता त्यांचे विचार बघावे यावर भर देऊन संसार हा आर्थिक
बाबींवर नाही तर चांगल्या विचाराने, आचाराने व समजूतदारपणाने यशस्वी होतात
असे स्पष्ट केले.
कात्यायनी वधु – वर केंद्राच्या सौ अनघा भावे यांनी मेळावा यशस्वी
होण्यासाठी सौ. साधना उपाध्ये ‘शुभम वधु – वर केंद्र’ सौ. स्वाती संभूस
‘स्वाती वधु – वर केंद्र’, सौ. सविता इनामदार ‘गार्गी वधु – वर’, सौ.
मुग्धा गोगटे ‘सप्तपदी वधु – वर’, लायन सौ. सुनीता कुलकर्णी ‘शुभविवाह वधु
– वर केंद्र’, सौ. सुवर्णा कुंटे ‘अपेक्षापूर्ती वधु -वर केंद्र’, सौ. आशा
तांबे ‘श्री वधु -वर केन्द्र’, सौ. नेहा कुलकर्णी ‘अक्षदा वधु – वर केंद्र’ या सर्व वधु वर केंद्रांचे सहकार्य मिळाले. श्री. महेंद्र संभूस यांनीही विशेष सहकार्य केले. मध्यवर्तीतील सौ. चैत्राली दशरथ, श्री. रमाकांत रायरीकर, श्री. रवींद्र पुरोहित, लायन्स क्लबच्या लायन सौ. सुनीता कुलकर्णी तसेच लायन श्री. जयंत कुलकर्णी यांचेही सहकार्य लाभल्याचे व्यक्त केले.
मेळाव्यास सुरुवात होताना वधु वारांनी नवे पुकारून स्वतःची माहिती सांगितली. प्रत्येकजण यात उत्साहाने सहभागी झाले. ७ – ८ जणांचा प्रत्यक्ष संपर्क या मेळाव्यात झाले.
संस्थेचे पदाधिकारी श्री. विश्राम कुलकर्णी, कार्यवाह मुकुंद वाडेकर, सहकार्यवाह श्री. दिलीप संभूस या कार्यक्रमास उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अनघा भावे यांनी केले.

 

 

 

संस्थेचे पत्रक Download करा